स्थापना – १९५६
विद्यार्थीनी संख्या – १३७८
शिक्षक – ३९
शिक्षकेतर कर्मचारी – १२
वर्गसंख्या – २७
१९५६ पर्यंत ओझरसारख्या ग्रामीण भागात माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. सातवीपर्यंत शिक्षण जिल्हा लोकल बोर्डाच्या शाळेत मिळत होते. माध्यमिक शिक्षणासाठी मुलांना पिपंळगाव किंवा नाशिक येथे जावे लागत होते. संस्थेचे अध्यक्ष कै. गो.ह.देशपांडे, ओझरचे कै. दादासाहेब उपाध्ये, शंकर बाळा कासार, श्री. वसंतराव उपाध्ये, श्री रामराव गायकवाड, श्री. वल्लभशेट भट्टड, दत्तूशेठ अक्कर यांनी पुढाकार घेतला व जून १९५६ मध्ये ‘नवीन इंग्रजी शाळा’ सुरू करण्यात आली. शंकरशेठ कासार यांनी त्यांची दुकानाची जागा दिली आणि ३२ विद्यार्थ्यासह शाळा सुरू झाली. पहिले मुख्याध्यापक म्हणून श्री. रा. ग. वीरकर काम पाहू लागले. १९५९ मध्ये अकरावीचा वर्ग सुरू झाला व शाळेचे ‘पूर्ण हायस्कूल’ मध्ये रूपांतर झाले. एप्रिल १९५९ मध्ये शाळेला सरकारकडून दोन एकर जागा मिळाली. इमारतीसाठी ३५ हजार रुपयांचे अनुदान मिळाले व ६ हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. २६ मार्च १९६० रोजी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक डॉ. ए.जी.पवार यांच्या शुभहस्ते इमारतीची कोनशिला बसवली गेली.
स्थापना – १९५६
विद्यार्थीनी संख्या – ७४५
शिक्षक – २५
शिक्षकेतर कर्मचारी – १०
वर्गसंख्या – १६
१९५५ पर्यंत भगूर गावात प्राथमिक शिक्षणाची सोय नव्हती. गावातील विविध स्तरांतून शिक्षणप्रेमी गावकरी पुढे आले व त्यांनी पंचसमितीची स्थापना केली. श्री. अंबादासशेठ पवार, कै. काशिनाथशेठ झंवर, श्री. मधुकरपंत जोशी, श्री. गणोरे, श्री. कापसे आदी या समितीच्या सदस्यांनी ना. ए. सोसायटीच्या कार्यकर्त्यांना गावात माध्यमिक शाळा स्थापन करण्याची विनंती केली आणि ग्रामीण भागातही आपण शिक्षणाच्या प्रसाराचे काम हाती घ्यावयास हवे या विचाराने संस्थेने जून १९५५ मध्ये शाळेची स्थापना केली. प्रांरभी एक वर्ग व ३२ विद्यार्थी अशी शाळा सुरू झाली. श्री. ग. शं. देशमुख शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते. अल्पावधीतच विद्यार्थी संख्या वाढत गेली.
स्थापना – १९५७
विद्यार्थीनी संख्या – १७००
शिक्षक – ४३
शिक्षकेतर कर्मचारी – १४
वर्गसंख्या – २७
नाशिकरोड परिसरातील श्री. बाळासाहेब देशमुख, म. वा. वर्टी, श्री. गोविंदराव कोकीळ, कै. आ. रा. राजाध्यक्ष आदी मान्यवरांनी या परिसरात संस्थेने मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू करावी अशी इच्छा प्रदर्शित करून त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तेव्हा जून १९५७ मध्ये संस्थेने नाशिकरोड येथे कन्या शाळा सुरू केली. श्रीमान धरमदास सामळदास कोठारी व श्रीमान बाबासाहेब कोठारी यांनी जेलरोडवरील बंगला प्रांरभी शाळेसाठी नाममात्र भाडयाने
दिला व कन्या शाळेचे दोन वर्ग भरू लागले. शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ठकार गुरूजींनी जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर शाळेची प्रगती पाहून श्रीमान कोठारी बंधूंनी बंगल्याशेजाची जागा व आर्थिक साहाय्य दिले आणि ‘सेठ धरमदास सामळदास कोठारी कन्याशाळा’ म्हणून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागली.
कन्याशाळेच्या इतिहासात १५ ऑगस्ट १९६९ हा दिवस सुवर्णदिन होय. या दिवशी शाळेने नव्या आधुनिक पध्दतीच्या वास्तूत प्रवेश केला. १९७० मध्ये शाळेची नवी वास्तू पूर्ण झाली. वास्तूचा भूमिपूजन समारंभ पुणे विद्यापीठाचे कुलगुरू श्री. हरिभाऊ पाटसकर ह्यांचे शुभहस्ते संपन्न झाला होता. तर १० चा वर्ग व एक हॉल असलेल्या नवीन देखण्या वास्तूचा उदघाटन सोहळा एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती प्रेमीलाबेन ठाकरसी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. विद्यार्थिनींच्या वाढत्या संख्येला तरीही जागा अपुरी पडू लागल्यामुळे शाळेच्या विस्तारीत वास्तूचा प्रकल्प संस्थेने हाती घेतला. शाळेचे उदार देणगीदार श्री. बाबासाहेब कोठारी ह्यांनी पुन्हा औदार्याचा हात पुढे केला. १२ लाख रूपयांची देणगी त्यांनी दिली. शाळेच्या इमारतीचा कायापालट होऊन एक भव्य, दिव्य, सुसज्ज इमारत उभी राहिली.